Thursday, January 12, 2012

(हात) चोळीत चला!

काम फत्ते झालं नाही की हात चोळीत बसणं क्रमप्राप्त असतं. थंडीतही असंच होत असावं. त्याशिवाय का कोणी हात चोळीत जातात? (कुठे ते विचारू नका.) कडाक्याच्या थंडीत बंडीही अपुरी पडू लागल्यावर होळीची वाट पाहणे संयुक्तिक असते. होळी काय किंवा चोळी काय ही एक गरम नरम अफूची गोळीच ठरते. एकीने रंगता येतं, दुसरीसाठी रांगावं लागतं. होळी आल्याशिवाय ऊन पोळत नाही हा भाग योगायोगाने पुढे येतोच की. धगधगत्या होळीपुढे हात चोळून काय फायदा? तसाच हातावर हात चोळीत बसून होळीच्या रंगील्या गप्पा मारण्यातसुद्धा काय हशील? फार वेगळ्या अर्थाने सांगायचं तर हात चोळीत जाण्यापेक्षा तो भलत्याच ठिकाणी गेल्याची ‘हाळी’ ठोकण्यात काहीजण वाकबगार असतात. तर बात चोळीची चालली होती, होळीची नाही. पण एक साम्य लक्षात घेण्याजोगं- हात चोळीत बसला काय किंवा होळी पुढं धरला काय चांगलाच ‘शेकून’ निघतो हा बहुतेकांचा अनुभव असावा. कशाला तरी काहीतरी घासलं की वातावरण (अन् आवरणही!) गरम होणारच ठरलं. तर अशा घासाघीशीची वेळ येऊन ठेपली आहे बघा!
तर एक ‘आगाव’ पोरगी, (जिला नाव गाव नसते अशी आगाव!) जिचं सर्व काही चोळीत बसतं (मिळालेल्या नोटा, मोबाईल वगैरे...) उलटपक्षी इतरांना तशा चोळीची गरजच नाही इतकं ते दखल घेण्याजोगं नसतं अशा विरोधाभासित टंच, उंच अन् ‘पंच’ (इंग्रजीतला पंच, मराठीतलाही!) बसेल अशी उन्मत्ततेने ‘भार’लेली (ल्याली!) पोरगी ‘आबा’ला उद्देशून एका ‘उनाड’ (ऊन शब्दांच्या आड दडून!) गाण्यात म्हणते कशी- ‘वळखीनं वळख तुमीच काढली मुद्द्याचं बोलून थेट, अवो आबाऽऽऽ, जरा सरकून बसा की नीट, हात चोळीत चाललाय कुठं?’
डान्सबार बंदी लागू झाली असली तरी आमचे हे ‘रस’रसिक आबा त्यातले (मंत्रिमंडळातले) नाहीत बरं. हे ‘संत्री’मंडळातले! (मोसंबी-नारंगी(नार-रंगी) वगैरेतले!) पाठीवर गुद्दा देऊन नेमका मुद्दा ह्यांना वदवता येतो, मर्मावर बोट ठेवता येतं, कर्मानं जाणलेलं ‘वर्म’ ओठांवर आणता येतं. आणि इतका आटापिटा करुनही पदरात काहीच पडलं नाही तरी पदर’मोड’ करून हात चोळीत जाणं ह्यांचा हातखंडा धर्म! धर्मावरून आठवलं, तसं कर्मावरूनच असेल बहुतेक पण काहीतरी आठवलं हे काय थोडं आहे? तर आठवलं की ‘चंदनाची चोळी घातली तरी अंगांग पोळीत जाते’ असा कुठेतरी अध्यात्मातही (कान्हो वनमाळी वेगी भेटवा...?) उल्लेख आलेला आहे. विचार केला, चंदन तसं थंडक देणारं द्रव्य तरीपण अंगावर घेताच पोळत जातं म्हणजे काय?
तर तशी परिस्थिती आज आलेली आहे. इतकी ‘जाम’ (खोबरेल तेलाचाही जाम व्हावा इतकी) थंडी पडलीय की तिला उचलून अंगावर घेताच ती पोळू लागावी अशी मनीषा(इच्छा!) मनी(मनात) वस्ती करू पाहते आहे. कधी नव्हे तो पारा उतरलाय, तोंडाच्या वाफा बाहेर पडताहेत, आतली गर्मी नरम होऊन जातेय, दवबिंदूंचेच जिथे हिमकण होऊ लागले आहेत तिथे वेगळ्या बिंदूंचा टिकाव तरी लागेल का? अशा गुलाबी थंडीत (पहाटे) नऊ वाजेतो मल्मली (तारुण्याच्या म्हणा हवं तर!) रजईत खुसरपुसर करीत राहण्याचा योग रोज येवो असे काही ‘चोळी’बहाद्दरांना वाटले तर नवल ते कसले?
असा हा एकंदर गरमागरम मामला हात शेकून घेण्यास पुरेसा आहेसे कुणीही सांगेल. कारण चोळीत बसलं काय किंवा गेलं काय हातांना कोमट ते उष्ण करून घेता येणं सहजसाध्य आहे. मग वाट कसली बघता लेको, हाक किंवा हाळी फार फार तर होळी येण्याआधीच चोळीत चला...

2 comments:

  1. हाहाहाहाहाहा!
    इतकी ‘जाम’ (खोबरेल तेलाचाही जाम व्हावा इतकी) थंडी पडलीय की तिला उचलून अंगावर घेताच ती पोळू लागावी अशी मनीषा(इच्छा!) मनी(मनात) वस्ती करू पाहते आहे. कधी नव्हे तो पारा उतरलाय, तोंडाच्या वाफा बाहेर पडताहेत, आतली गर्मी नरम होऊन जातेय, दवबिंदूंचेच जिथे हिमकण होऊ लागले आहेत तिथे वेगळ्या बिंदूंचा टिकाव तरी लागेल का?

    अशक्य!

    ReplyDelete
  2. डॉक्टर साहेब pune 6.4 degree cel.मध्ये सुद्धा तुमचा हा लेख वाचून वातावरण एकदम उबदार होऊन गेले. मस्त...

    ReplyDelete