आज ती खूप दिवसांनी आली. तरी सात आठ महिन्यांनी भेटत असावी. तब्येत बरीच सुदृढ झाल्याचे जाणवत होते. पूर्वीचं मळभ चेहऱ्यावर नव्हतं. ताजेपणा, टवटवी अन् आत्मविश्वासाचे भाव डोळ्यांत होते. मला वाटले ती पॉलीसिच्या कामाकरिता आली असावी. म्हणून मी फाईल पुढे ठेवली.
‘मी यासाठी नाही आले सर. मी तुमच्यासाठी आलेय.’
‘म्हणजे?’
‘काय माहीत पुन्हा इकडे येणं होतंय की नाही.’
‘असं का म्हणतेस तू? काही ठरलंय का?’
‘नाही. ठरल्यावर आधी तुम्हांला नसतं का सांगितलं?’
‘मला वाटलं की लग्न बिग्न करतीयेस की काय.’
‘लग्न जरी झालं तरी तुम्हांला भेटायला येऊ शकत नाही का मी?’
‘तरी पण काहीतरी झालंय, म्हणूनच तू असं म्हणतीयेस.’
‘म्हटलं चला आता पुन्हा भेट होण्याची शक्यता कमी आहे. आत्ताच भेटून घेऊ. म्हणून आले सर.’
मला प्रश्न पडला ही पुन्हा भेटणार नाही म्हणतेय म्हणजे नक्कीच हिचा काहीतरी प्लॅन झालेला दिसतोय. त्याशिवाय ही असं टोकाचं बोलू शकणार नाही. मी जास्त खोदून विचारणं अप्रस्तुत ठरलं असतं. कारण एक तर ती खूप कालावधी नंतर निवांत भेटत होती. ती जे काही सांगेल तितकंच ऐकायचं असं ठरवून मी गप्प राहिलो. हिच्या मनात नक्कीच मोठी खळबळ असावी असा माझा कयास होता. ती पुन्हा का भेटू शकणार नाही हे कळायचं होतं. आणि ती पुन्हा येणार नाही म्हणून थोडी रुखरुखही जाणवू लागली होती. तशी ती अंतर राखून मैत्री करणारी मुलगी. गोड बोलणारी अन् सदा हसतमुख राहणारी. आज जरा निर्वाणीचं बोलतेय हे कुठे तरी खटकत होतं. आपण कामाच्या व्यापातून तिला फोन करू शकलो नाही की आणखी काही चूक आपल्याकडून झाली असावी? अशा अनेक प्रश्नांनी मी अंतर्बाह्य घुसळून निघालो.
‘चला सर येताय का यूएसएला?’
‘येऊ की. कधी जायचं?’
‘जोक नाही हं. माझ्याबरोबर यायचं. याल ना?’
‘अगं तू फक्त घेऊन चल. मी येतो की नाही ते बघ.’
मी थोड्या मिश्किलीने बोललो. त्याच तिच्या मुग्ध शैलीत हसतांना नंतर ती थोडी गंभीर झाली.
‘यूएसएला निघालेय सर.’
‘अगं काय सांगतेय काय? अचानक कसं ठरलं?’
‘तिकडे जुबेर असतो, अमित आहे आणि कविताही आहे.’
‘म्हणजे त्यांची तिकडे फॅमिली वगैरे आहे का?’
‘नाही सर. ते एकत्र राहतात.’
माझे डोळे चमकले. पण तिला त्याचं काही वाटलं नाही. परदेशात अनेक मुलं-मुली एकाच बंगल्यात छानपैकी राहत असतात. त्यात काय एवढं विचार करण्यासारखं? असा प्रश्न तिच्या नेत्रांनी बोलून दाखविला.
‘जुबेर अन् कविता रिसर्चमध्ये आहेत. तर अमित सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जॉबला आहे.’
‘मग तू तिकडे जाऊन काय करणार? रिसर्च?’
‘हो. केमिस्ट्रीमध्ये रिसर्चसाठी भरपूर जागा आहेत म्हणे.’
‘म्हणजे तुझं तिकडे जाणं नक्की झालंय तर?’
‘हो. व्हिसाच्या कामासाठीच आले होते. म्हटलं चला सरांचा निरोप घेऊन जाऊयात.’
‘अच्छा. म्हणून तू म्हणतेय की पुन्हा भेटू की नाही कोण जाणे. पण परत येणार असशीलच की.’
‘नाही येणार बहुतेक.’
‘तिकडेच सेटल होणार की काय?’
‘मग काय तर. राहणार तिथेच. तसे बरेच फ्रेंड्स आहेत तिकडे.’
‘पण मग इकडच्या फ्रेंड्सचं काय?’
‘चार पाच दिवस काढतील आठवण. पुन्हा त्यांचं रुटीन सुरु झाल्यावर विसरतील मला. नाहीतरी मी त्यांच्यात नसल्याने बिघडणार आहे का?’
मी काहीच बोललो नाही. हिच्या मानत काय सल असावी याचा थांग लागत नव्हता. लग्नाचं वय असतांना, चांगली स्थळं येत असतांना असं अचानक निघून जाण्याची भाषा करणं म्हणजे काहीतरी नक्कीच बिनसलं असणार.
‘काय झालंय? अशी अचानक तू तिकडे जायचं का म्हणतियेस?’
या माझ्या प्रश्नाबरोबर तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. अश्रू दाटले. आसवे ओसंडण्यापूर्वीच तिने हातांनी थेंब आवरले. पर्समधून पाण्याची बॉटल काढून ती दोन घोट पाणी प्याली. तरीही तिच्या नेत्रकडा ओलावत होत्या. फार कसोशीने तिने अश्रू माघारी परतविले. त्या अश्रूंच्या मागे अनेक भल्याबुऱ्या जखमा भळभळत असाव्यात याचा मला अंदाज आला.
‘काय गं, काय झालं?’ मी तिच्या ओलेत्या डोळ्यांत खोलवर पाहत विचारलं. सर्वच सांगायला पाहिजे का? असा भाव त्या ठिकाणी उपस्थित होत होता. म्हणजे तिच्या मनात काय वादळ आहे हे मीच ओळखून घ्यावं असा तिचा मानस होता. परंतु गेले कित्येक दिवस तिचा माझा संवाद झालेला नसल्यामुळे मला तिच्या जीवनात काय उलथापालथ झालीये याची कल्पना येणार नव्हती. त्या पूर्वी रोज म्हटलं तरी आम्ही फोनवर बोलत असू. त्यावेळी ती त्या दिवशी जे जे घडलं असेल ते ते निःसंकोचपणे सांगायची. कोण कसं वागलं यावर आमची चर्चा व्हायची. अलीकडे तिचा फारसा फोन येत नव्हता. ती जॉब सोडून घरीच राहिली होती. यामागेही काहीतरी कारण घडून गेलेलं असावं जे की तिने कधीच मला सांगितलं नव्हतं. मी त्या हेतूने विचारताच म्हणायची, मी आजारी असते सर, म्हणून जॉब सोडून दिला. अन् ते खरंही होतं. रोज पन्नास साठ किलोमीटर अंतरावरून बसने अपडाऊन करून तिची प्रकृती खालावली होती. जेवणाचे हाल, वेळी अवेळी खाणं यांमुळे तिला रक्तक्षय झाला होता. तिचा उत्साह मावळत चालला होता. एकापरीने ती घरी राहिली हे योग्यच होतं.
त्या चार पाच महिन्यांत काय झालं कुणास ठावूक? तिचे फोन येणं जवळजवळ बंदच झालं होतं. आणि आज अचानक तिने परदेशी जाण्याचे सूतोवाच केल्याने मला धक्काच बसला. त्यात तिच्या डोळ्यात तरळलेले अश्रू पाहून माझी खात्रीच पटली की काहीतरी जबर बोच हिच्या अंतरात सलते आहे म्हणून ती इथून दूर जाण्याचे योजिते आहे.
‘काय झालं सांग ना. मला सांगण्यासारखं नाहीये का?’
‘च च’ करून तिने डोळ्यांतील आसू लपवीत जे काही घडलं असेल ते उघड करण्यास असमर्थता दर्शविली. मग मी समजून घेतलं हिला सांगावयाचे नाही तर आपण का म्हणून खोदून विचारावं?
‘ठीक आहे. मजेत रहा, आनंदात रहा, नवी स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न कर. बेस्ट ऑफ लक.’
‘थँक्यू सर.’ म्हणत तिने आपली पर्स खांद्याला अडकवून माझा निरोप घेतला. मी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिलो. पुढे होऊन तिचा हात धरून मी थांब म्हणू शकत नव्हतो की मोठ्ठ्याने हाळी देऊन तिला थोपवू शकत नव्हतो. माझा तसा अधिकार होता का? की तिने मला तशी मोकळीक देऊ केली नव्हती? खास मला भेटण्यासाठी ती वाट वाकडी करून का बरे आली असावी? तिच्या मनात आपल्याबद्दल नेमकी कोणती भावना आहे? तिकडे गेल्यावर ती आपल्याशी संपर्क ठेवील की नाही? की मला पूर्णपणे तोडून टाकण्यासाठीची ही तिची खेळी असावी? अशा कित्येक प्रश्नांचा गुंता सोडवतांना ती कधी निघून गेली ते कळलेही नाही...
ती आता पुन्हा येणार नव्हती, तिची भेट पुन्हा होणार नव्हती, पुढे तिच्याशी संवाद होईल की नाही याचीही शाश्वती नव्हती. एका प्रसन्न वसंतॠतूप्रमाणे आयुष्यात भेटलेली ती आता अचानक शिशिराची पानगळ मागे आठवण म्हणून ठेऊन दूरदेशी निघाली होती...
*****************************************************************************
0 comments:
Post a Comment