Saturday, June 25, 2011

'ब्र' ला एक काना

एका नामंकित वृत्तपत्राने स्त्री 'विषया'ला हात घालून काही गोष्टी सार्वजनिक करण्याचा उपक्रम अवलंबिलेला आहे. अशीच एक पुरवणी वाचनात आली. नाजूक विषय साजूक तुपात घोळवून पुढे मांडला की उड्या पडतात हा अनुभव तसा नेहमीचाच. 'मागील' पुरवणी गाजल्यावर या 'पुढील' पुरवणीतून स्त्रियांची आणखी एक गोष्ट सार्वजनिक करण्यात आली आहे. अर्थात त्यातील नमूद केलेली माहिती निश्चितच अनुसरणीय असली तरी हे वृत्तपत्र महिला किंवा तरुणी किती मन लावून वाचतात हा संशोधनाचा विषय ठरावा. कारण हे वर्तमानपत्र असून सर्वाधिक वाचक पुरुष असतात हे लक्षात घेऊन कोणता विषय हाताळावा याचे तारतम्य बाळगायला हवे होते, असे वाटते. यातील लेख अश्लीलतेकडे झुकणारे नसले तरी ते पुरुषांकडून आंबट नजरेने वाचले जातील यात शंका नाही. त्यातील मार्गदर्शक तत्वे अमलात आणण्याचे सुचविण्याऐवजी भलताच समज रूढ होण्याची शक्यता आहे.
हे अंतर्वस्त्र वापरल्याने कर्करोग होतो’च’ असे वेगवेगळ्या लेखांतून सर्वेक्षणाचा हवाला देत तीनदा ठासून सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तसे पाहिले तर कोणतेही दाटके वस्त्र कोणीही फार काळ लेऊ शकत नाही. चोवीस तास तर त्याहूनही नाही. बरे रोज रोज तेच तेच शिळे कपडे कोण घालील? पण असे घडू शकते व त्याने तसे घडेल... असा 'जर तर' चा मुद्दा चर्विला गेलाय. जी ती स्त्री आपल्या अंतर्वस्त्राबाबत नक्कीच जागरूक असते. ते धुवायचे कसे अन् ल्यायचे कसे हे जाहीररित्या सांगणे जरुरीचे होते असे वाटत नाही. असो.
ज्या गोष्टीबद्दल मुली व स्त्रिया ब्र काढू शकत नाहीत (असे तुम्हीच म्हणता!) तर तुम्ही चार पाच पाने खरडून चारचौघांत (चौघीत नव्हे!) प्रकाशित केलीच कशाला? आपण पुरुष जशा हवापाण्याच्या गप्पा मन लावून मारतो, तशा स्त्रिया आपापसांत या विषयावर विस्तृत चर्चा करीत असतात, कारण कोणतीही गोष्ट शेअर करण्यासाठी पुरुषांपेक्षा स्त्री अगोदर आपली मैत्रीण गाठते, ही त्यांची मानसिकता लक्षात घेता आली नाही का? पुरुष सहसा अशा गोष्टी शेअर करीत नसतो. काय वापरावे, काय वापरू नये, कशाने काय त्रास होतो याबाबत प्रत्येक स्त्री मुदलातच चोखंदळ असते. याचा पदोपदी प्रत्यय येतच असतो. तरीही हा विषय कव्हर करून (कव्हरवर टाकून) आतल्या बाजूने काय साध्य करावयाचे आहे तेच कळत नाही. कदाचित उद्या ही वस्त्रे उत्पादीत करणाऱ्या कंपन्या आम्ही डब्ल्यूएचओ च्या हुकुमाबरहुकूम प्रोडक्ट बनवीत असतो, तेव्हा आमची वस्त्रे वापरल्याने तुम्हांला कॅन्सरच काय अल्सरही होणार नाही अशी ‘दिल’खेचक जाहिरात करायला मागे पुढे पाहणार नाहीत. असो.
या विषयावरचे समग्र लेख वाचून असे वाटू लागते की मग हे वापरावेच कशाला? नाहीतरी अंदमानातील जारवा आदिवासी निसर्गावस्थेतच राहतात की. आपणही एक कपडा आतून घातला नाही तर चालणार नाही का? आजही गावाकडे या वस्त्राची फारशी चलती नाहीये. तरीही त्यांचं सौष्ठव वाखाणण्याजोगं ठसठशीत ठरतं. आजही काही खेड्यातील जमातीत फक्त लुगडे नेसण्याची प्रथा आहे. त्यांना व त्यांच्या बाप्यांना ते अंगवळणी पडलेलं असतं. आपणासारख्या चारभिंतीत कोंडून घेण्याची सवय लागलेल्यांना ते अनावृत्त सौंदर्य पचनी पडत नाही इतकाच मुलभूत फरक. खरे तर अर्धावृतात सौंदर्य रेखाण्याची जी पुरुषी मानसिकता आहे, त्याचाच परिपाक म्हणजे ही वस्त्रे होत. मग तिथे नुसत्या दोऱ्या असल्या काय किंवा फक्त वाट्या, फरक कोणाला पडतो? डायरेक्टर सक्ती करतो म्हणून त्या नट्या तशी त्रोटक वस्त्रे घालतात. त्यांचं अंधानुकरण करणं टाळलं तरी खूप मोठी मजल मारल्यासारखे होईल. पण आजच्या तरुणाईला सांगणार कोण? असो.
तरीही हा खाजगी विषय सार्वजनिक करायला नको होता असे वाटते.

1 comments:

  1. डॉक्टर साहेब,
    तुमच्या ह्या लेखा बद्दल आम्ही "ब्र" काढायचे धाडस बाळगतो नि सांगतो कि... लेख सुंदर झालाय....
    अहो....... आताच्या काळात झालंय कसं कि,व्यक्ती स्वातंत्र्य नि विचार स्वातंत्र्याच्या नावाखाली उठसूठ कुणीही,कसं हि आणि कुठे हि उधळाव हा पायंडाच पडलाय नि त्या मुळे जिथपत रेटल जातंय तितपत रेटायच,रेटत राहायचं हा सगळ्यांचा अलिखित नियमच बनलाय,त्या मुळे आपण फक्त म्हणायचं कि कालाय तस्मै नमः ! नि दुसर काय !

    ReplyDelete