आज प्रत्येक घराच्या दारात एक दमलेला बाबा आपल्या चिमण्यांची वाट पाहतांना दिसून येतो. घरच्या होममिनिस्टर त्यांच्याच तोऱ्यात असतात. त्या अन् त्यांचं ऑफिस यातच गुरफटलेल्या असतात. त्यांचं करिअर इतकं मोठ्ठं की सर्व भार बाबाच्या खांद्यावर येऊन तो धापाच टाकीत राहतो. वाणसामान, दुधबील, लाईटबील असे किरकोळ खर्च बाईसाहेबांच्या पेमेंट मधून तर फ्लॅटचा हप्ता, गाडीचा इ.एम्.आय. असे आकडे बाबाच्या खात्यातून परस्पर परागंदा होण्याची तरतूद बाबाने स्वीकारलेली असते. आणि मग तरीही त्याला वाढदिवसाची साडी, दिवाळीचा रत्नहार, मकरसंक्रांतीचा नेकलेस अशाची जुळवाजुळव आपल्याच खात्यातून करण्याची गोडगुलाबी सक्ती केली जाते. अशी सक्ती बाबाला नवी नसली तरी टाळता मात्र येत नाही. जणू काही तीही एक जबाबदारीच असल्याच्या अविर्भावात बाईसाहेब ‘तुणतुण’त असतात...
शाळा सुरु व्हायच्या वेळी तर बाबा नामक पात्र इतके मेटाकुटीला येते की खिसा उलथा पालथा करुन स्कूल फी, ट्युशन फी, स्टेशनरीचा खर्च, गणवेश इ. घेऊन देण्याचं कर्तव्य त्याच्याच माथी मारलं जातं. बाबाला लागलेल्या दम्याकडे कोण लक्ष देतो मग? त्याची धाप ऐकू येण्याइतपत बाईसाहेब जाग्या राहत असतील तर ना?
सकाळी उठून कपड्यांच्या घड्या घालणे, केरकचरा काढणे, भांड्यातील खरकटी ओली सुकी अशी वेगवेगळ्या थैल्यांमध्ये भरणे, रिकामी भांडी प्रसंगी घासणे, कपडे वॉशिंग मशीनला लावणे ही कामे करता करता बाईसाहेब काय करणार तर फक्त स्वैपांक! म्हणजे पाच सहा पोळ्या लाटणे, भाजी टाकणे इतकेच! कुकर लावण्याचे काम अर्थात बाबाकडेच वळतं. त्यानंतर पोरांचा डबा भरणे, सॅक भरणे, त्यांना अंघोळी घालून बस येण्यापूर्वीच रेडी ठेवणे, बस मध्ये व्यवस्थित बसवून देणे. ही कामं तर बाबाला अगत्याने करावीच लागतात. मग उरतात बाकीच्या गोष्टी. स्वतःचा टिफिन स्वतःच भरून घेऊन ऑफिस गाठायचं, तिथेही बॉस’मॅडम’चा शब्दनशब्द झेलत मान मोडून काम करायचं.
ऑफिस सुटलं की थेट घरी येण्याशिवाय पर्याय नसतो. कारण आता चिमणीपाखरं येण्याची वेळ झालेली असते. वाळलेले कपडे व्यवस्थित घड्या घालून जिथल्या तिथे ठेवून पुन्हा झाड लोट करायची. पोर बाळांना काहीतरी चॅवमॅव खायला करायचं. कधी उपीट, तर कधी भेळ, तर कधी सामोसे आणायचे. येतांनाच बाबा मंडईतून भाजी घेऊन आला तर बाईसाहेबांचा पारा चढत नसतो.
मुलं आली की त्यांचे कपडे चेंज करून त्यांना खायला प्यायला घालून जरावेळ खेळायला सोडलं की हुश्श करायचं. कुकर लावेपर्यंत गृहमंत्री हजर! मग काय त्यांच्या दिमतीत बाबाचा कसा वेळ जातो कळतच नाही. गिझर चालू करून देणे, चहाला आधण ठेवणे, सकाळचं दुध तापविणे, कुकरच्या शिट्ट्या मोजणे, बाईसाहेबांच्या हातात चहाचा वाफाळता कप ठेऊन अदबीने उभं राहिलं की त्या खेकसणार- ‘असा काय शुंभासारखा उभा राहतोस? माझं सिरीयलमध्ये लक्ष लागत नाहीये तुझ्यामुळे. जा पोळ्यांचं पीठ मळून ठेव. अगदी एकजीव मळ बरं का? नाहीतर मागच्या सारखं पात्तळ रगडा करून ठेवशील. जा. पोरं येतील खेळून. त्यांना हात पाय धुवायला लावून अभ्यासाला बसव. मी तोवर माझं आवरून स्वैपाकाला लागते. तू त्यांचा होमवर्क बघ. अभ्यास घे. मी जेवायला बोलवीन तेव्हाच उठायचं. काय? जा आता...’
मान खाली घालून आज्ञा शिरसावंद्य केली की पुन्हा काम काम आणि काम... पोरं तरी काय गप्प बसणारी असतात का? गडबड गोंधळ घालतात, बाबाचं ऐकत नाहीत. ते आपल्या बाबाला असं का बरं छळीत असावेत? हे बाबालाही कळत नसतं. अभ्यासाला बसवंलं तरी नीट स्टडी करीत नाहीत. त्यात त्यांचा अभ्यास घेणं म्हणजे दिव्यकर्मच असतं. बाबा ओरडून ओरडून थकून जातो. कधी तर मुलांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतांना त्याचा जीव मेटाकुटीला येतो. रात्रीची जेवणं उरकून ताटं बेसिन मध्ये ठेवली की जरा निवांतपणे सोफ्यावर बसून काय स्कोर झाला ते पहावं म्हणून थांबावं तर आतून गृहमंत्री ओरडणार- ‘आता काय बसालायेस टीव्ही समोर? चल झोपायचं नाहीये का? मला उद्या जरा लवकर ऑफिसला जायचंय.’
हिरमोड करून बेड रूम मध्ये जावं आणि बाईसाहेबांच्या जवळ सरकावं तर तिथेही बाबाचा हक्क चलत नसतो. चल झोप बघू मुकाट्याने, अजिबात हालचाल करायची नाही. मला खूप झोप येतीय, अंगाला झटू नकोस चल हो बाजूला.
आणि बाबा ‘बाजूला’ बसल्यासारखं तोंड घेऊन मानसिकरीत्या दमून जातो... झोपतो कुठला? आज काय काय केलं याची उजळणी करीत उगाच आपलं या कुशीवरून त्या कुशीवर वळत राहतो...
0 comments:
Post a Comment